‘दीनदयाळ’ या नावाला ज्यांनी आयुष्यभर न्याय दिला असे थोर व्यक्तिमत्व म्हणजे पंडित दीनदयाळ उपाध्याय – भय्याजी जोशी यांचे प्रतिपादन
दि. ०७ ऑक्टोबर, २०२१ (मुंबई) : ‘आपल्या नावाप्रमाणे व्यक्तीचा स्वभाव असतोच असं नाही पण ‘दीनदयाळ’ या नावाला ज्यांनी आयुष्यभर न्याय दिला असे थोर व्यक्तिमत्व म्हणजे पंडितजी! भारताबद्दल एक शाश्वत विचार त्यांनी दिला. आपली असंख्य मंदिरं नष्ट केली तेव्हा अनेकांना वाटलं आता भारत संपेल लोकांनी ती परत उभी केली. नालंदा, तक्षशिलेतील ग्रंथसंपदा नष्ट केली तेव्हाही अनेकांना वाटलं की आता सगळं संपलं पण पुन्हा ग्रंथसंपदा निर्माण झाली. शेकडो वर्षांच्या पारतंत्र्यानंतर देखील भारत हे सगळे धक्के पचवून पुन्हा उभा राहिला आणि गर्व वाटावा अश्या दिशेने वाटचाल आपण केली’, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ अधिकारी भय्याजी जोशी यांनी दि. ०६ ऑक्टोबर रोजी भाईंदर येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या ज्ञान नैपुण्य केंद्रात वसलेल्या पं. दीनदयाळ उपाध्याय दर्शन प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्यात केले. भय्याजी जोशी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि खा. डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या विशेष उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
दीनदयाळजींनी अंत्योदयचा विचार रुजवण्याचं काम तर केलंच पण आपल्या अंगी असलेला साधेपणाही कधी सोडला नाही त्यामुळे प्रबोधिनीत येणाऱ्या प्रशिक्षणार्थींना, कार्यकर्त्यांना या प्रकल्पामुळे आपापल्या क्षेत्रात काम करताना प्रेरणा मिळेल असा विश्वास प्रबोधिनीचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या सहकार्याने रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या पुढाकारातून निर्माण झालेल्या पं दीनदयाळ उपाध्याय दर्शन प्रकल्पात प्रामुख्याने पं. दीनदयाळ उपाध्याय यांचे विचार, त्यांचे सामाजिक आणि राजकीय योगदान याविषयी चित्र आणि लेख स्वरुपात मांडणी केली आहे. दीनदयाळजींच्या एकात्म मानवदर्शन या विषयी युवा पिढीने आत्ताच्या दृष्टीकोनातून अध्ययन करणे आवश्यक आहे, त्यासाठी तरुणांनी या वास्तूचा उपयोग करावा असे आवाहन प्रबोधिनीचे उपाध्यक्ष खा डॉ विनय सहस्रबुद्धे यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रबोधिनीचे महासंचालक रवींद्र साठे यांनी केले तर देवेंद्र पै यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि उमेश मोरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. लोकार्पण सोहळ्यासाठी प्रबोधिनीचे इतर विश्वस्त देखील उपस्थित होते. या प्रकल्पाला सगळ्यांनी आवर्जून भेट द्यावी असे आवाहन प्रबोधिनीच्या वतीने करण्यात आले. वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.